दोन गटांमधील भांडण – 4 वर्षीय मुलीसह तिघे जखमी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या भांडणाने हिंसक स्वरुप धारण केले आहे. दोन्ही गटांनी परस्परांवर गोळीबार केला आहे. शनिवारी संध्याकाळी सुमारे 5 वाजता (अमेरिकेतील प्रमाणवेळ) ही घटना घडली आहे. या गोळीबारात तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 वर्षीय मुलीचाही समावेश आहे, ती स्वतःच्या कुटुंबीयांसोबत खेळणी खरेदी करण्यासाठी पोहोचली होती.
ब्रूकलिनमध्ये राहणारे कुटुंब स्वतःच्या मुलीला खेळणी मिळवून देण्यासाठी आले होते. गोळीबारात मुलीच्या पायाला गोळी लागली आहे. याचबरोबर रोड आयलँडची 23 वर्षीय महिला पर्यटक आणि न्यू जर्सीच्या 43 वर्षीय महिलेलाही गोळी लागली आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डेरमॉट शिया यांनी दिली आहे.
पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटविली आहे. त्याच्याबद्दल माहिती जमविली जात आहे. पण भांडणाचे कारण समजू शकलेले नाही. भांडणादरम्यान एकाने बंदूक बाहेर काढत गोळीबार सुरू केला होता असे शिया यांनी सांगितले.
गोळीबार करणाऱयाचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या संवेदनाहीन हिंसेच्या गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून एनवायपीडी पीडितांना न्याय मिळवून देणार असल्याचे न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी म्हटले आहे.
यापूर्वी इडाहो येथील एका शाळेत गुरुवारी एका मुलीने गोळीबार केला होता. या घटनेत 2 मुलांसह 3 जण जखमी झाले होते. शिक्षकाने मुलीकडून बंदूक हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता.