ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
फेसबुक, सिल्वर लेक, विस्टा इक्विटी या नंतर रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अजून एका कराराची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, हा करार जिओ प्लॅटफॉर्म आणि न्यूयॉर्कमधील खाजगी इक्विटी फंड कंपनी ‘जनरल अटलांटिक’ यांच्यामध्ये झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनरल अटलांटिक कंपनीने केवळ 1.34 टक्के हिस्सेदारी करीता जिओ मध्ये 6,598.38 कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म ची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये तर एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही जनरल अटलांटिक बरोबर करार करताना खुश आणि उत्साही आहोत. मी त्यांचे स्वागत करतो. जागतिक गुंतवणुकीसाठी ते आमच्यासाठी महत्त्वाचे पार्टनर आहेत. आमच्या प्रमाणेच जनरल अटलांटिक देखील भारताला डिजिटल सोसायटीच्या रूपात पाहू इच्छिते. त्यामुळे आम्ही देखील जनरल अटलांटिक कडील 40 वर्षांची वैश्विक विशेषज्ञता आणि दूरदृष्टीचा उपयोग करून घेऊ.
जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, जागतिक तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन समर्थक आणि दूरदर्शी उद्योजक म्हणून आम्ही जिओमध्ये गुंतवणूक करण्यास अत्यंत उत्साही आहोत. आणि मुकेश अंबानी यांना खात्री आहे की डिजिटल कनेक्टिव्हिटी मध्ये अशी क्षमता आहे की ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. भारतात डिजिटल क्रांती आणण्यात जिओ सगळ्यात पुढे आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.