ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस ने तर अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क मधील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचे निधन झाले आहे.
भारत – अमेरिका यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचा मोठा हात होता.
दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर दुःख झाले. भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते कायम स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत माझी सहानुभूती आहे. ओम शांती.. “
अधिक माहितीनुसार, 23 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नऊ दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ब्रह्म कांचीबोटला हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी सहकारी होते.
न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत 38 हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोना ची लागण झाली आहे. तर 5000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.