ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 8 फूट उंच कास्य पुतळय़ाची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलं आहे. अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाने या घटनेचा तीव्र निषेध क्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे केली आहे.
2 ऑक्टोबर 1986 रोजी गांधींच्या 117 व्या जयंतीनिमित्त मॅनहॅटनमध्ये गांधीजींच्या कांस्य पुतळय़ाचे अनावरण करण्यात आलं होतं. गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाऊंडेशनने हा आठ फूट उंच पुतळा दान दिला होता. 2001 मध्ये हा पुतळा तिथून हटवण्यात आला होता. त्यानंतर 2002 मध्ये पुन्हा स्थापित करण्यात आला. काही समाजकंटकांनी शनिवारी पहाटे या पुतळ्याची तोडफोड केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागासमोर या प्रकरणाच्या तात्काळ चौकशीची मागणी अमेरिकेतील भारतीय दुतावासाने केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे.
गेल्यावर्षीही काही अज्ञात हल्लेखोरांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अशाच प्रकारे आणखी एका गांधी पुतळय़ाची विटंबना केली होती.