जलतरण तलावावरील निर्बंध हटणार : जगभरात 76,22,021 कोरोनाबाधित : 4 लाख 24 हजार 325 बळी
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4 लाख 24 हजार 325 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांचा आकडा 76,22,021 वर पोहोचला आहे. याचदरम्यान 38,60,312 जणांनी या संसर्गावर मात करण्यास यश मिळविले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधून महत्त्वाचे वृत्त समोर आले आहे. गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी जलतरण तलाव आणि मैदाने पुन्हा खुली करण्यास मंजुरी दिली आहे. प्रातांच्या कुठल्याही भागात क्लस्टर असल्यास तेथे या सुविधा मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ब्राझीलमध्ये संकट
ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्याने बोल्सोनारो यांना होणार विरोध वाढू लागला आहे. परंतु बोल्सोनारो यांच्या समर्थकांची संख्याही लक्षणीय आहे. देशात 8,05,649 बाधित सापडले आहेत. मागील 24 तासांत 30 हजार 412 रुग्ण आढळून आले आहेत. सलग पाचव्या दिवशी 30 हजारांपेक्षा अधिक बाधितांची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा 41,058 वर पोहोचला आहे. दिवसभरात 1,239 जणांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक बाधित आढळून आले आहेत.
न्यूयॉर्क प्रांतामध्ये दिलासा
अमेरिकेत महामारीने सर्वाधिक पीडित न्यूयॉर्क प्रांताने नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. सार्वजनिक जलतरण तलाव आणि मैदाने सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहेत. त्यांच्या वापरादरम्यान सावधगिरी बाळगावी लागणार आहे. न्यूयॉर्क प्रांतात दिवसभरात 736 नवे रुग्ण सापडले आहेत. तर प्रांतातील रुग्णांचा एकूण आकडा 3 लाख 80 हजार 892 वर पोहोचला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीमुळे हजारो जणांना जीव गमवावा लागला आहे.
हज यात्रेला मंजुरी नाही
मलेशियाचा कुठलाही नागरिक यंदा हज यात्रेवर जाणार नसल्याची घोषणा धार्मिक विषयक मंत्री जुल्किफी मोहम्मद अल बाकरी यांनी केली आहे. हज यात्रेशी संबंधित निर्णय राजे अब्दुल्ला यांच्याशी चर्चा आणि त्यांच्या सहमतीनंतर घेण्यात आला आहे. देशच नव्हे तर जगासाठीदेखील हा अत्यंत अवघड काळ असल्याचे बाकरी यांनी म्हटले आहे.
इस्रायल : 214 रुग्ण
25 एप्रिलनंतर इस्रायलमध्ये पहिल्यांदाच 200 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात तेथे 214 नव्या रुग्णांची पुष्टी मिळाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 18 हजार 569 झाला आहे. मागील 24 तासांमध्ये एक रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचा एकूण आकडा 300 झाला आहे. इस्रायलमध्ये 3,019 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
नेपाळ : निर्बंध हटणार
नेपाळमध्ये 24 मार्चपासून लागू असलेले निर्बंध आता हटविले जाणार आहेत. तत्पूर्वी आरोग्य मंत्रालय नवे दिशानिर्देश प्रसिद्ध करणार असून त्याचे पालन अनिवार्य असणार आहे. सर्वप्रथम व्यावसायिक हालचाली सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना दिली जाणार आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत 4,614 रुग्ण सापडले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
मास्कच सर्वाधिक उपयुक्त
मास्क बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे टेक्सास आणि कॅलिफोर्नियात झालेल्या अध्ययनात दिसून आले आहे. ऍटमॉस्फेरिक सायन्सचे संशोधक रेन्यी झांग यांच्या पथकाने इटली आणि न्यूयॉकमध्ये मास्क अनिवार्य करण्यापूर्वी आणि केल्यानंतरच्या स्थितीचे अध्ययन केले आहे. या दोन्ही ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आल्यावर रुग्णसंख्या घटू लागल्याचे अध्ययनात आढळून आले आहे.
पाकिस्तानात रुग्ण वाढले
इम्रान खान सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. देशात सलग दुसऱया दिवशी 6 हजारांपेक्षा अधिक नवे बाधित सापडले आहेत. बाधितांचा आकडा शासकीय आकडेवारीवर आधारित असला तरीही प्रत्यक्षात हे प्रमाण अत्यंत अधिक असल्याचे डॉन न्यूजने नमूद केले आहे. इम्रान खान सरकार देशाला सांभाळण्यास सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. आता देवच या देशाचे रक्षण करू शकतो असे उद्गार नवाज शरीफ यांच्या पीएमएल या पक्षाचे खासदार ख्वाजा आसिफ यांनी काढले आहेत.
संसर्गाचा वेग कायम
ब्राझील आणि पेरूनंतर मेक्सिकोतही महामारी वेगाने फैलावत आहे. सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. बाजारपेठ बंद असूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही. दिवसभरात मेक्सिकोत 4,790 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांच आकडा आता 1,33,974 झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 587 जणांचा मृत्यू झाला आहे. बळींचे एकूण प्रमाण 15,944 वर पोहोचले आहे. मृत आणि बाधितांचे प्रमाण याहून अधिक असू शकते असे सरकारनेच म्हटले आहे.