दगडाने ठेचून खून केल्याचे उघड : पोलीस स्थानकातील गटबाजीमुळे तपासास विलंब
प्रतिनिधी /बेळगाव
न्यू गांधीनगर येथील एका वृद्धेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी अमननगर परिसरात खुनाचा प्रकार उघडकीस आला असून दोन दिवसांनंतरही खुनाचे गूढ कायम आहे. या वृद्धेचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. माळमारुती पोलीस स्थानकात अधिकाऱयांच्या जाचाला पोलीस कंटाळले असून त्यामुळे गटबाजी वाढली आहे. या गटबाजीचा फटका तपासकार्याला बसत आहे.
जैबुनबी शमशेर जमादार (वय 75, रा. न्यू गांधीनगर) असे त्या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी रात्री 11 ते मंगळवारी सकाळी 6.30 यावेळेत खुनाचा हा प्रकार घडला आहे. जैबुनबी यांचा मुलगा नासीर जमादार याने माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
यासंबंधी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता वृद्धेच्या खुनाचा अद्याप तपास लागला नाही. माळमारुती पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. लवकरच गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यात येतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
गेल्या काही महिन्यांपासून जैबुनबी यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. सोमवारी रात्री 11 वाजता जेवण करून त्या आपल्या घरातून बाहेर पडल्या होत्या. रात्री-अपरात्री घराबाहेर पडून त्या फिरत असत. अमननगर परिसरात मंगळवारी सकाळी खून झालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱया, घरफोडय़ांचे प्रकार वाढले आहेत. याबरोबरच वृद्धेच्या खुनाने परिसरात खळबळ माजली असून कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे. अधिकाऱयांच्या जाचांना पोलीस कंटाळले आहेत. त्यामुळे अनेक जण बदल्या करून घेण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी वाढली आहे.