दुरुस्तीकडे दुर्लक्ष, डागडुजी करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
न्यू गुडशेडरोड येथे एकूण 13 ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे पडून वर्षाच्यावर कालावधी लोटला तरी ते दुरूस्तीकडे कोणाचेच लक्ष नाही. या खड्डय़ांमधून स्थानिक रहिवाशांना दररोज ये-जा करावी लागते. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
न्यू गुडशेड रोड, नर्तकी थिएटरसमोर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हेस्कॉमकडून वर्षभरापूर्वी खोदाई करण्यात आली होती. खोदाई करून वीजवाहिन्या घालण्यात आल्या. परंतु मारण्यात आलेले खड्डे अद्यापही बुजविण्यात आलेले नाहीत. रात्रीच्यावेळी अंधारामध्ये खड्डे निदर्शनास न पडल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याची डागडुजी करण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत..