झी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. वेळप्रसंगी कान धरला आणि पाठ थोपटून भरपूर कौतुकही केले. वेगवेगळय़ा सामाजिक स्तरातील लोक हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या संकटकाळात प्रत्येकाला आपापली चिंता आणि ताणतणाव आहेतच, पण काही क्षणासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चेहऱयावर हसू उमटवतो. सध्या लॉकडाऊनमध्येही चला हवा येऊ द्या मुळे आमचा वेळ मजेत जातो असे सांगणारे अनेक फोन आणि मेसेजेस या कार्यक्रमातील कलाकारांना येतात, असे श्रेया बुगडेने सांगितले.
प्रेक्षकांच्या या आवडत्या कार्यक्रमाचे चित्रीकरणदेखील लवकरच चालू होईल पण या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात प्रेक्षकांना सहभागी होता येणार नाही. याबद्दल बोलताना कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, येत्या काळात न्यू नॉर्मलमध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणे हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळय़ा प्रकारची स्किट्स आम्ही सादर करू. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवानी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची मी खात्री देते, असे ती म्हणाली.