सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, पॉप गायिका शकीरा, टोनी ब्लेअर यांच्यासह दिग्गजांची नावे उघड
वॉशिंग्टन, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगभरातील शोधपत्रकारांच्या टीमने पँडोरा पेपर्सच्या माध्यमातून लाखो कागदपत्रांचा अभ्यास करून अवैध मार्गाने श्रीमंत बनलेल्या अब्जाधीशांची नावे उघड केली आहेत. या यादीत जगभरातील सध्याच्या 35 सत्ताधाऱयांची आणि 300 हून अधिक सेलिब्रेटींच्या नावांचा समावेश आहे. तसेच भारताचा माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नावाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर काही बडय़ा राजकारण्यांची नावेही यादीत समाविष्ट असल्याने देशात खळबळ निर्माण झाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या संस्थेच्या अहवालात पीएनबी घोटाळय़ातील आरोपी नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी, पॉप गायक शकीरा आणि राजकारणी टोनी ब्लेअर आदींची नावेही समाविष्ट आहेत.
काही वर्षांपूर्वी पनामा पेपर्सने बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार करणाऱया जगभरातील अनेक मोठय़ा लोकांची तसेच भारतीयांची नावे उघड केली होती. त्याचप्रमाणे आता शोधपत्रकारांच्या एका टीमने 1.19 कोटी कागदपत्रांचा अभ्यास करत गुप्त पद्धतीने झालेले आर्थिक व्यवहार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. जगभरातील मोठय़ा सेलिबेटींनी आपल्या अवैध आर्थिक व्यवहारासाठी बनावट ऑफशोअर कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांचा वापर बेहिशेबी पैसा लपवणे, कर चुकवणे अशा कारणांसाठी केला गेला, असे पँडोरा पेपर्सने म्हटले आहे. पँडोरा पेपर्स लीकसाठी जगभरात 120 दशलक्ष कागदपत्रांची तपासणी केली असून 117 देशांतील 600 पत्रकारांनी तपासात भाग घेतल्याचे ‘आयसीआयजे’ने सोशल मीडियावर जाहीर पेले आहे.
पँडोरा पेपर्समधील 1.19 कोटी फाईल्सच्या या लीकमध्ये पनामा, दुबई, मोनाको, स्वित्झर्लंड आणि केमन बेटांसारख्या करांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱया ट्रस्ट आणि कंपन्यांच्या निर्मितीची कागदपत्रे आहेत. जगातील 35 राजकारण्यांची नावे पँडोरा पेपर्समध्ये नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये सध्याच्या युगातील सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी नेते यांचा समावेश आहे. याशिवाय उद्योगपती आणि इतर अनेक सेलिब्रेटींची नावेही या यादीत आहेत. शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील अनेक नामांकित व्यक्तींनी परदेशात गुंतवणूक केली आहे. परंतु त्यांची संपूर्ण माहिती सरकारी संस्थांना दिलेली नाही.
सचिन तेंडुलकरचे व्यवहार पारदर्शक ः वकिलांचे स्पष्टीकरण
गैरमार्गाने अब्जावधी रुपयांची संपत्ती कमावल्याचा आरोप झाल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. सचिन तेंडुलकरने आपले सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे केले असून सरकारचा करही वेळोवेळी भरला आहे, असे त्यामध्ये म्हटले आहे. तर पॉप गायिका शकीराच्या वकिलाने पॉप गायिका आपल्या कंपन्यांकडून कर लाभ घेत नाही आणि तिने त्यांच्याशी संबंधित आवश्यक माहिती सरकारला दिली असल्याचे स्पष्ट केले.
लाखो डॉलर्सच्या मालमत्तांचा संदर्भ
समाजातील उच्चभ्रू व्यतिरिक्त भ्रष्ट लोकांच्या परदेशातील कथित मालमत्तेच्या लपवाछपवीचा आरोप असल्यामुळे इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सच्या (आयसीआयजे) अहवालाला ‘पँडोरा पेपर्स’ असे नाव दिले जात आहे. या अहवालांमध्ये संबंधित लोकांनी परदेशात कोटय़वधी रुपयांच्या मालमत्ता कोणत्याप्रकारे लपवल्या याचा खुलासाही करण्यात आला आहे. याच संस्थेने पाच वर्षांपूर्वी ‘पनामा पेपर्स’ उघड केले होते. ‘पँडोरा पेपर्स’कडे भारतासह 91 देशांतील सुमारे 35 आजी-माजी राष्ट्रप्रमुख, 330 हून अधिक राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्या फाईल्स आहेत.
भारतीय राजकारण्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात
काही भारतीय राजकारण्यांची नावे पँडोरा पेपर्समध्ये आली आहेत, परंतु त्यांची नावे सार्वजनिक केली गेली नाहीत. सध्या उघड झालेल्या दिग्गजांपैकी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बऱयाच निकटवर्तियांचा समावेश आहे. त्यांनी स्वतःची मालमत्ता लपवण्यासाठी आणि कर वाचवण्यासाठी परदेशात कंपन्या आणि ट्रस्ट तयार केल्याचा आरोप आहे.
पँडोरा पेपर्स लीकमुळे पाकिस्तानमध्ये दहशत
पँडोरा पेपर्स लीकमुळे पाकिस्तानच्या राजकारणात दहशत निर्माण झाली आहे. या यादीत 700 पाकिस्तानी आहेत. इम्रान खान सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही या यादीत आहेत. यामध्ये जलसंपदा मंत्री मूनिस इलाही, उद्योगमंत्री खुसरो बख्तियार, अर्थमंत्री शौकत तरिन आणि खासदार फैसल वावडा यांचा समावेश आहे. नेत्यांशिवाय सैन्य अधिकाऱयांची नावेही यादीत समाविष्ट आहेत. या पर्दाफाशानंतर मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजने पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, यादीत नावे असलेल्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण इम्रान खान यांनी केले आहे.