नवी दिल्ली/प्रतिनिधी
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चां होत्या. पण पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे म्हणत या प्रकरणाला पूर्णविराम दिला होता. परंतु नाराज असलेल्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली. बीड जिल्ह्यात प्रथम भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. मात्र, पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. त्यांच्ंयासोबत जेपी नड्डा आणि पक्षाचे इतर राष्ट्रीय सचिवही उपस्थित आहेत.