वार्ताहर /उसगांव
उसगांव पंचायतीच्या प्रभाग 9 मधील नवनिर्वाचित पंचसदस्य गोविंद रत्नाकर परब फात्रेकर यांचा कसयले तिस्क-उसगांव येथील श्री महागणपती देवस्थान समिती तसेच कसयले ग्रामस्थांतर्फे गौरव करण्यात आला. पंचदसस्य गोविंद परब फात्रेकर हे श्री महागणपती देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत.
समितीचे उपाध्यक्ष श्रीनिवास फात्रेकर, सचिव रामू सांगोडकर, खजिनदार संजू गावणेकर, सहसचिव राजेश केरकर, सहखजिनदार घारसू पिळयेकर, सदस्य महेंद्र नाणशीकर, प्रमोद रायू नाईक, हरिश्चंद्र गावडे, संदीप झोरे, श्रीनिवास देसाई तसेच प्रणय पेडणेकर, उगम गावकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष श्रीनिवास फात्रेकर व ज्येष्ठ सदस्य तथा देवस्थानचे पुजारी श्रीनिवास देसाई यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गोविंद परब फात्रेकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना प्रणय पेडणेकर म्हणाले, गोविंद परब फात्रेकर यांच्यावर विश्वास व कार्य करण्याची क्षमता असल्याने मतदारांनी एकजूट दाखवून भरघोस मतांनी त्यांना विजयी केले. मतदारांचा हा विश्वास सार्थ ठरवित ते प्रभागाचा सर्वांगीण विकास साधतील. प्रमोद नाईक यांनी सांगितले की, प्रभागाचा विकास साधण्याबरोबरच येथील लोकांचा सामाजिक विकास व आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यासाठी गोविंद परब फात्रेकर हे सदैव प्रयत्नरत राहणार आहेत. या प्रभागाला तरुण व तडफदार नेतृत्व लाभले असून ग्रामस्थांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोविंद परब फात्रेकर म्हणाले, मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरणार असून विकासकामात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. विकासकामे राबविताना कुठलाही भेदभाव न करता प्रभागाचा व प्रभागातील नागरीकांचा विकास हाच ध्यास घेऊन आपण प्रयत्नशील राहणार आहे. श्रीनिवास फात्रेकर यांनी स्वागत केले. राजेश केरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर रामू केरकर यांनी आभार मानले.