पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची सूचना
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सर्व पंचायतींना परिपत्रक पाठवून एका वर्षात 4 ग्रामसभा घेण्याची सूचना पंचायत खात्याने केली आहे. जानेवारी एप्रिल, जुलै, ऑक्टोबर अशा चार महिन्यात चार ग्रामसभा घेण्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गट विकास अधिकाऱयांची (बीडीओ) बैठक घेतल्यानंतर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली.
ते म्हणाले की 2020 या वर्षात पंचायतींच्या ग्रामसभा झाल्या नाहीत. कोरोनाचे संकट चालू असल्यामुळे त्या घेणे शक्य झाले नाही. आता ते संकट कमी झाले असून कोरोनाचे सर्व नियम-अटी, एसओपी पाळून सभा घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.
लवकरच मिळणार वित्त आयोगाचा निधी
पंचायतीना 14 व्या वित्त आयोगातर्फे देण्यात आलेल्या निधीचा वापर करण्यात येत असून अनेक पंचायतीची अनेक कामे चालू आहेत. 15 व्या वित्त आयोगाचा निधी आला असून त्याचे वितरण आता यापुढे होणार आहे. गोवा राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायती स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत. त्यांनी 14 व्या वित्त आयोगाचा निधी पूर्णपणे वापरावा तसेच 15 व्या वित्त आयोगाचा निधी देखील पंचायतींना मिळणार असल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले.
पंचायनींना तसेच बीडीओंना स्वयंपूर्ण गोव्याची संकल्पना त्यांनी समजावून सांगितली असून पंचायतींना स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.