प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांचे निवेदन- ‘एनआरएफ’ने दावा फेटाळला, पाकिस्तानचे फायटर विमान पाडल्याचा व्हिडीओ व्हायरल
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानात तालिबानने पंजशीर प्रांताचा पूर्ण ताबा घेतल्याचा दावा केला आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी एक निवेदन जारी करून अफगाणिस्तानचा शेवटचा बालेकिल्ला काबीज केल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, तालिबानने यासंबंधी दावा केला असला तरी तालिबानविरोधात लढणाऱया नॅशनल रेझिस्टन्स प्रंटने (एनआरएफ) हा दावा फेटाळल्यामुळे यासंबंधीची द्विधावस्था कायम आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे लढाऊ विमान पंजशीरमध्ये पाडल्याचे दिसून येत आहे. मात्र, याला दुजोरा मिळालेला नाही.
आतापर्यंत पंजशीरमध्ये नॅशनल रेझिस्टन्स प्रंटचे नेते अहमद मसूद यांचा ताबा होता. पंजशीरवरून तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स प्रंट यांच्यात संघर्ष सुरु होता. यामध्ये दोन्ही बाजूने शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर 21 दिवसांनी आता तालिबान्यांनी पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर दिसणाऱया छायाचित्रांमध्ये तालिबानचे लढाऊ सैनिक प्रांतीय गव्हर्नरच्या कंपाऊंड दरवाजासमोर उभे असल्याचे दिसून आले आहेत. मात्र, या दाव्याला पूर्णपणे पुष्टी मिळू शकलेली नाही.
पंजशीर प्रांत पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आला आहे. सर्वशक्तिमान ईश्वराच्या मदतीने पंजशीर प्रांतावर पूर्णपणे विजय मिळाला आणि इस्लामी अमिरातच्या नियंत्रणात आला. आम्ही पंजशीरच्या नागरिकांसोबत कोणताही भेदभाव करणार नाही. ते सर्व आमचे बांधव आहेत आणि आम्ही एक देश म्हणून एकत्र राहू. या विजयानंतर आमचा देश पूर्णपणे युद्धाच्या भोवऱयातून बाहेर आला आहे, असे तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद म्हणाले. तसेच येथे स्थानिकांना आता शांततापूर्ण सुखी जीवन, स्वातंत्र्याचा आनंद आणि बंधुत्व मिळेल, असेही तालिबानने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
एनआरएफ कमांडरचा लढताना मृत्यू
पंजशीरमध्ये तालिबान्यांना विद्रोही गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असतानाच नॅशनल रेझिस्टन्स प्रंटचे कमांडर आणि प्रवक्ते फहीम दश्ती यांचा तालिबान्यांशी लढताना मृत्यू झाला आहे. यासंदर्भात ‘एनआरएफ’कडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली. फहीम दश्ती यांच्यासोबत पंजशीरमधील आणखी एक नेते जनरल अब्दुल वदोद जारा यांचाही मृत्यू झाला आहे. अन्य जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सत्तास्थापनेसाठी तालिबानची धडपड सुरूच
अफगाणिस्तानातील सर्व प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने देशात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी आठवडाभरात सरकार स्थापन केले जाईल असे सांगितले आहे. आता युद्ध संपले असून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना स्वीकार होईल असे सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबानने चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि तुर्कस्थानला निमंत्रण दिल्याची चर्चा आहे. या देशांनी यापूर्वीच तालिबान संघटनेशी संपर्क साधला आहे.
अमेरिकन सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात जाणार ः अमेरिकन सेनेटर
अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून परतले आहे. 31 ऑगस्टच्या डेडलाईनच्या एक दिवस आधी लष्कराने अफगाणिस्तान सोडले, पण आता अमेरिकन सैन्याला पुन्हा अफगाणिस्तानात जावे लागेल. हे नजीकच्या भविष्यात घडणार आहे, असे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानात सुधारणा केलेल्या नाहीत. त्यांची विचारसरणी जगाच्या आधुनिकतेशी जुळत नाही. ते त्यांची जुनी विचारसरणी अफगाणिस्तानच्या लोकांवर लादतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालिबान अल कायदाला भरभराटीसाठी सुरक्षित जागा देईल. त्यामुळे तालिबानसाठी देश सोडला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.