वृत्तसंस्था/ चंदीगड
सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष हॉकी या क्रीडाप्रकारात भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक मिळविल्यास या संघातील पंजाबच्या प्रत्येक खेळाडूंला पंजाब शासनाकडून 2.25 कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्यांचे क्रीडामंत्री राणा गुरमित सिंग सोधी यांनी दिली.
या स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने प्राथमिक गटातील सामन्यात चांगली कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. 20 जणांच्या भारतीय पुरूष हॉकी संघामध्ये पंजाबच्या 11 हॉकीपटूंचा समावेश आहे. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये भारताने आतापर्यंत आठवेळा हॉकीचे सुवर्णपदक मिळविले असून या क्रीडाप्रकारात शेवटचे सुवर्णपदक 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत पटकाविले होते.