वृत्तसंस्था/ अबु धाबी
आयपीएलमध्ये गेलच्या आगमनानंतर विजयी वारूवर स्वार झालेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ शुक्रवारी राजस्थान रॉयल्सशी लढणार असून प्लेऑफच्या आणखी समीप पोहोचणे हेच त्यांचे मुख्य लक्ष्य असेल. राजस्थानला मात्र प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवण्याकरिता विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.
या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर नाटय़मय कलाटणी मिळाली आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाची विजयी घोडदौड सुरू झाली. या स्पर्धेतील पहिल्या सर्वोत्तम चार संघांना धूळ चारताना त्यांनी सलग पाच विजय मिळविले आहेत. 12 सामन्यांतून 12 गुण घेत सध्या ते चौथ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सची मात्र घसरण झाली असून ते 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. 12 सामन्यांत त्यांना सात पराभव स्वीकारावे लागले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी काही संघांत जोरदार चुरस लागल्याचे मात्र दिसून येते. मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाला असून उर्वरित तीन स्थानांसाठी सहा संघांत चुरस लागली आहे. त्यामुळे राजस्थानला हा सामना गमविणे परवडणारे नाही. त्यांचा पराभव झाल्यास प्लेऑफ शर्यतीतून ते बाहेर पडतील आणि पंजाब संघ पराभूत झाल्यास अव्वल चार संघांत स्थान मिळविण्याच्या त्यांच्या आशेला धक्का बसणार आहे.
या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱयांत आघाडीवर असणारा पंजाबचा कर्णधार केएल राहुल मागील तीन सामन्यात मोठी खेळी करू शकलेला नाही. शुक्रवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्याने या सामन्यात त्याला मोठे योगदान देण्याची गरज आहे. गेलच्या समावेशाने या संघाच्या मनोबलात आश्चर्यकारक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मयांक अगरवाल गुडघ्याच्या दुखापतीमुळे मागील दोन सामन्यात सहभागी झाला नव्हता. त्याचा या सामन्यात समावेश केला जातो का, हे पहावे लागेल. त्याच्या गैरहजेरीत मनदीप सिंगने सलामीला चमक दाखविली असून केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 66 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. पंजाबची गोलंदाजी हा या स्पर्धेतील त्यांचा सर्वात कच्चा दुवा ठरला होता. पण गेल्या काही सामन्यांत त्यांच्या प्रदर्शनातही कमालीची सुधारणा झाली आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्यांनी चांगले यश मिळविले आहे.
राजस्थान संघानेही आधीच्या सामन्यात बलाढय़ मुंबई इंडियन्सवर विजय मिळविला असल्याने त्यांचेही मनोबल उंचावलेले आहे आणि हाच विजयी जोम पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आधीच्या पाच सामन्यात विशेष चमक दाखवू न शकलेल्या बेन स्टोक्सला फॉर्म गवसल्यामुळेही ते खुशीत आहेत. सलामीला बढती मिळाल्यानंतर स्टोक्सने नाबाद 107 धावा फटकावत मुंबई इंडियन्सवर आपल्या संघाला 7 गडय़ांनी विजय मिळवून दिला. संजू सॅमसनलाही पुन्हा लय मिळाली आहे. मात्र बटलर वरचेवर चुका करतोय. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या बॅड पॅचमधून जात असल्याने पंजाबसाठी ते दिलासा देणारे ठरेल. जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वाखालील त्यांची गोलंदाजी मात्र सामान्य वाटत आहे. आर्चरने सर्वात चांगले यश मिळविले असून त्याने 6.71 च्या इकॉनॉमी रेटने 12 सामन्यांत 17 बळी टिपले आहेत. इतर सहकारी गोलंदाजांकडून मात्र त्याला पुरेशी साथ मिळालेली नाही.
@राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, जयदेव उनादकट, मयांक मार्कंडे, महिपाल लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, मनन व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.
@किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), अगरवाल, कॉट्रेल, गेल, मॅक्सवेल, शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, नीशम, पूरन, पोरेल, अर्शदीप सिंग, एम. अश्विन, के.गौतम, हरप्रीत ब्रार, दीपक हुडा, जॉर्डन, सर्फराज खान, मनदीप सिंग, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंग, जगदीश सुचित, तजिंदर सिंग, हार्डस व्हिलोएन.