ऑनलाईन टीम / चंदीगड :
संगरुरमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेले पंजाबचे आरोग्यमंत्री बलवीर सिद्धू यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यामध्ये मंगळवारी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घेतली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
विशेष म्हणजे, ट्रॅक्टर रॅलीमध्ये राहुल गांधी यांच्या सोबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, काँग्रेस प्रभारी हरीश रावत, काँग्रेस प्रधान सचिव सुनील जाखड यांच्या सह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला होता ते आरोग्य मंत्र्यांच्या संपर्कात आले होते.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू यांना ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामूळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तसेच मागील एका आठवड्यात आरोग्य मंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात असून त्यांची देखील कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचे यावेळी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.