वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात खेळविल्या जाणाऱया सय्यद मुश्ताक अली टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या पंजाबच्या 30 जणांच्या संभाव्य यादीत भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगचा समावेश करण्यात आला आहे.
युवराज सिंगने काही दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता पंजाबच्या संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आल्याने तो पुन्हा राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 2011 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघामध्ये युवराज सिंगचा समावेश होता. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 39 वर्षीय युवराज सिंगने 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मोहालीच्या स्टेडियमवर त्याने आपल्या सरावालाही प्रारंभ केला आहे. मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात खेळविली जाणार असून 2 जानेवारीला या स्पर्धेत सहभागी होणारे संघ एकत्रित येणार आहेत.