ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमधील बंद ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यासाठी लष्कराने पुढाकार घेतला आहे. लष्कराचे तज्ज्ञ नंगलमधील दोन प्लँटवर काम करत असून, येत्या दोन-तीन दिवसांत ते सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकारने दिलेल्या संपूर्ण यादीनुसार लष्कर वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन इंडस्ट्रियल प्लँटमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणार आहे, त्याचा उपयोग वैद्यकीय उपचारांसाठी करण्यात येणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ऑक्सिजनचा कोटा वाढवा, असे आवाहन केंद्राला केले आहे. तसेच जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल आरपी सिंग यांच्यासमवेत बैठक घेत कोरोनाशी लढण्यासाठी मदत मागितली होती. याच आवाहनावर पाश्चिमात्य कमांड नंगलस्थित बीबीएमबी येथील 1962 पासून बंद असलेला ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात गुंतले आहे.