मोठय़ा प्रमाणावर विकास तरीही मतदार बदलाच्या मूडमध्ये
राजकारणात कार्यरत लोकांना जर विकासाचे व्हिजन पहायचे असल्यास त्यांनी पंजाबच्या लंबी मतदारसंघाला भेट द्यावी. या मतदारसंघात विकासकामे मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे प्रथमदर्शनीच जाणवते. हा मतदारसंघ देशातील सर्वात वयोवृद्ध राजकीय नेते, पंजाबचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांचा आहे.
बादल हे त्यांचे मूळ गाव असून तेथे सीव्हरेज आणि स्टेडियमपासून मोठय़ा रुग्णालयापर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. रस्ते देखील गुळगुळीत आहेत. राजकारणात विकासासह अन्य समीकरणेही महत्त्वाची असतात. याचमुळे निवडणुकीत उतरलेले 94 वर्षीय उमेदवार प्रकाशसिंह बादल यांना लंबी मतदारसंघात स्वतःचे विजयाचे सत्र कायम ठेवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागतेय. बादल मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. अशा स्थितीत त्यांच्या प्रचाराची धुरा पुत्रवधू आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमतर कौर बादल यांनी कार्यकर्त्यांसोबत हाती घेतली आहे.
बादल यांचा नातू आणि सुखबीर बादल यांचा पुत्र अनंतवीर सिंह बादल देखील स्वतःच्या आजोबांना विजय मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच सक्रीय झाला आहे. परंतु अनंतवीर सिंह हे भाषण करत न करता लोकांना हात जोडू अभिवादन करत आजोबांसाठी मते मागत आहेत.
लंबीत यंदा वेगळे सूर
प्रकाश सिंह बादल कधीच या मतदारसंघात पराभूत झाले नाहीत. परंतु मतदारसंघातील तरुणाईच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागतोय. बादल यांना लंबीमध्ये आव्हान देणारा कुणी मोठा राजकीय नेता नव्हे तर सर्वसामान्य व्यक्ती आहे. सातत्याने एकाच उमेदवाराला विजयी करणे योग्य नसल्याचे मत एका वर्गातून व्यक्त होतेय. आम आदमी पक्षाने लंबी मतदारसंघात गुरमीत सिंह खुडियां यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी त्यांच्या बाजूने अनुकूल वातावरण दिसून येते. काँग्रेसने युवा चेहरा जगपाल सिंह अबुलखुराना यांना संधी आहे. तर पहिल्यांदाच भाजप देखील या मतदारसंघातून स्वतःचे नशीब आजमावत आहेत. भाजपने राकेश ढिंगरा यांना उमेदवारी दिली आहे.
..त्यानंतर कधीच हरले नाहीत
बादल यांनी स्वतःची पहिली निवडणूक दलाच्या तिकीटावरच 1967 मध्ये गिद्दडबाहा मतदारसंघातून लढविली होती. तेव्हा बादल यांच्यासमोर केँसचे मातब्बर नेते आणि माजी मुख्यमंत्री हरचरण सिंह बराड विरोधात होते. बादल हे बराडा यांच्याकडून केवळ 57 मतांनी पराभूत झाले होते. बादल यांच्या राजकीय जीवनातील ही पहिली आणि एकमेव हार ठरली. त्यानंतर 1969 पासून 1992 पर्यंत गिद्दडबाहाचे ते आमदार राहिले. 1992 मध्ये अकाली दलाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तेव्हा काँग्रेसचे रघुवीर सिंह विजयी झाले, परंतु नंतर न्यायालयाने ती निवडणूक रद्द केली होती. 1995 मध्ये पोटनिवडणुकी झाली असता बादल यांनी स्वतःचे पुतणे मनप्रीत बादल यांना मैदानात उतरविले. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह यांनी रघुवीर सिंह यांचे पुत्र दीपक यांना उमेदवारी दिली. तरीही मनप्रीत बादल विजयी झाले होते.
लंबीची निवड
1997 मध्ये प्रकाश सिंह बादल यानी गिद्दडबाहा मतदारसंघ स्वतःच्या पुतण्याकरता सोडून लंबी विधानसभा मतदारसंघाची निवड केली. तेव्हापासून मागील 25 वर्षे लंबी मतदारसंघात ते अपराजित राहिले आहेत. येथे ते 20-25 हजार मतांनी विजयी होत राहिले एत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते कॅप्टन अमरिंदर सिंह स्वतः बादल यांच्या विरोधात पराभूत झाले होते.