चंदिगढ
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 25 जानेवारीपासून नामांकन प्रक्रिया सुरू होत आहे. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांनी याबाबत माहिती दिली. 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत नामांकन प्रक्रिया चालणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 फेब्रुवारीला होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी आहे. राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये 20 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे.
मागील आठवडय़ातच पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सोमवारी निवडणूक आयोगाने तातडीची बैठक घेत मतदानाच्या तारखेत बदल केला होता. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे.