नवीन 5 मंत्री घेणार शपथ ः तीन महिन्यांनंतर मंत्र्यांची संख्या वाढणार
@ चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता राजभवनात पंजाब सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या विस्तारात एकूण पाच मंत्री शपथ घेऊ शकतात. पंजाबमध्ये दुसऱयांदा आमदार झालेले अमन अरोरा मंत्री बनणार आहेत. याशिवाय अमृतसरमधील डॉ. इंद्रवीर निज्जर यांनाही मंत्री केले जाऊ शकते. त्याशिवाय दुसऱयांदा आमदार झालेले प्रा. बलजिंदर कौर किंवा सर्वजीत मानुके यांनाही मंत्री केले जाऊ शकते. तसेच पटियालामधून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव करणाऱया अजितपाल कोहली यांच्यासह अनमोल गगन मान, प्रिन्सिपाल बुधराम यांची नावेही चर्चेत आहेत. मंत्रिमंडळात एका महिला मंत्र्याचा समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
पंजाब सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह 10 मंत्री आहेत. आम आदमी पक्षाने सरकार स्थापन करताना मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त 10 मंत्री केले होते. मात्र, यात सहभागी असलेले डॉ. विजय सिंगला यांना भ्रष्टाचारप्रकरणी बडतर्फ करण्यात आल्यानंतर आता अमृतसरचे मंत्री बनवले जाणारे डॉ. इंद्रवीर निज्जर यांना आरोग्य मंत्रालय दिले जाऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे सध्या 28 खाती आहेत. अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाची मंत्रालये नवनियुक्त मंत्र्यांकडे सोपवली जाऊ शकतात.