सिद्धू, परगट अन् मंत्री चन्नींचा विरोध- नाराजांची झाली बैठक
वृत्तसंस्था/ चंदीगढ
पंजाबच्या काँग्रेस सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे आता अधिकच स्पष्ट झाले आहे. राज्याचे मंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या निवासस्थानी मंगळवारी एक बैठक पार पडली असून यात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असलेले अनेक नेते सामील झाले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान राज्य सरकारमधील नव्या घडामोडींमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चिंता वाढल्या आहेत.
मी टू शी संबंधित तीन वर्षे जुन्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्यावर पंजाबचे मंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या घरी बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रतापसिंग बाजवा समवेत अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते. हे सर्वजण कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असल्याचे मानले जाते.
महिला अधिकाऱयाचे आरोप
2018 मध्ये एका महिला आयएएस अधिकाऱयाने चन्नी यांनी काही चुकीचे संदेश पाठविल्याचा आरोप केला होता. पण महिला अधिकाऱयाने याप्रकरणी कुठलीच तक्रार नोंदविली नव्हती. प्रकरण निकाली निघाल्याचे मुख्यमंत्री अमरिंदर यांनी तेव्हा म्हटले होते. तर राज्य महिला आयोगाकडून सोमवारी चन्नी यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्यावर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. महिला अधिकाऱयासाठी न्याय इच्छित असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी म्हटले आहे. पीडितेने पंजाबबाहेर बदली करवून घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेस आमदाराचाही आरोप
तत्पूर्वी पंजाबमधील काँग्रेसचे आमदार परगट सिंग यांनी सरकारवर धमकाविल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार संदीप संधू यांचा फोन आला होता. संधू यांनी यादी तयार केली असून आता शिक्षा भोगण्यासाठी तयार रहा अशी धमकी दिल्याचा दावा परगट यांनी केला आहे. सरकारकडे सिद्धू यांच्या विरोधात पुरावे असल्यास दोन वर्षांपर्यंत ते दडवून का ठेवले अशी विचारणाही त्यांनी केली आहे. परगट सिंग यांना सिद्धू यांचे समर्थक मानले जाते. परगट हे मागील काही काळापासून अमरिंदर सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत.
सिद्धूंच्या विरोधात चौकशी
सिद्धू आणि मुख्यमंत्री यांच्यातील तणावानंतर पंजाब काँग्रेसमधील सुंदोपसुंदी चव्हाटय़ावर येत आहे. मंत्रिपदावरून हटविण्यात आल्यावर सिद्धू दररोज सरकारच्या कामकाजावरून प्रश्न उपस्थित करत आहेत. सिद्धू यांच्या विरोधात अलिकडेच दक्षता आयोगाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये सिद्धू यांच्यासह त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांचेही नाव अडकण्याची चिन्हे आहेत. मंत्रिपदी असताना सिद्धू यांनी नियमांचे उल्लंघन करत बिल्डर्सना लाभ मिळवून देणे आणि भूखंड वाटपात गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप आहेत. अशा स्थितीत आगामी काळात पंजाबच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.