ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असून, कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता पंजाब सरकारने राज्यातील कोरोनाचे सर्वच निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये फक्त 285 सक्रिय रुग्ण होते. तर गेल्या 24 तासात पंजाबमध्ये 48 रुग्णांची नोंद झाली आहे. या पैकी 18 ऑक्सिजन सपोर्ट, 4 आयसीयू आणि एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पंजाबमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.37% आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत. गृह खात्याने यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि सर्वच झोनल आयजीपींना पत्र लिहून तात्काळ कार्यवाही करण्यास सांगितले आहे.