रस्त्यावर अडविल्याने कृत्य, अटकेसाठी गेलेल्या पथकावर गोळीबार, 9 जणांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त
वृत्तसंस्था/ पटियाला
रस्त्यावर मोकाट फिरणाऱयांची चौकशी करणाऱया सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा निहंगी समुदायाच्या टोळक्याने तलवारीने हात तोडल्याची धक्कादायक घटना रविवारी पंजाबमधील पटियाला भाजी मंडईत घडली. शीख समुदायातील वेगळी ओळख असणाऱया निहंगी समुदायाच्या टोळक्याने हा हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला. पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सुरक्षा कडे तोडत पोलिसांवर प्राणघातक हल्ला
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी घेतला. त्यामुळे पोलीस रस्त्यावर विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई करत आहेत. रविवारी सकाळी निहंगी (शीख धर्मातील केवळ निळा पोशाख करणारे आणि शस्त्र ठेवण्याची परवानगी असणारा समुदाय) गाडीतून रस्त्यावरून निघाले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे संचारबंदीमध्ये असणाऱया सरकारी पासची मागणी केली. यावेळी निहंगी समाजाच्या टोळक्याने मंडईमधील कर्मचाऱयांबरोबर वादावादी करत पोलिसांनी रस्त्यावर ठेवलेले सुरक्षा कडे तोडत पटियाला भाजी मंडईत थेट गाडी घातली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या गाडीला घेरले. टोळक्यातील काही जणांनी थेट पोलिसांवर तलवार हल्ला केला. एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग यांचा हातच तलवारीने मनगटापासून तोडला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. हरजित सिंग यांच्यावर चंदीगढमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांवर हल्ला करणारे गुंड आहेत. आमच्या समुदायाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, असा दावा निहंगी समुदायाचे प्रमुख 96 करोडी बाबा बलबीर सिंग यांनी केला आहे.
पोलीस पथकावर गोळीबार, शस्त्रसाठा जप्त
घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले. बलबेडा येथील गुरुव्दारात लपून बसले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला. आरोपींना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी गुरुव्दारामधून पोलीस पथकावर गोळीबार केला. यानंतर पोलीस कमाडोंनी विशेष मोहीम राबवत 9 आरोपींना अटक केली. तसेच मोठा शस्त्रसाठा, 35 लाख रुपयांच्या रोख रकमेसह पेट्रोल बॉम्ब जप्त केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.