काँग्रेसचे माजी आमदार अरविंद खन्ना, मजीठिया यांचे निकटवर्तीय दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमध्ये निवडणुकीची घोषणा होताच भाजपने मोठे राजकीय भगदाड पाडले आहे. संगरूरचे काँग्रेसचे माजी आमदार अरविंद खन्ना, टोहडा परिवार आणि लुधियानातील युवा अकाली नेता गुरदीप गोशा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपचे पंजाब प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत पेले आहे.
अरविंद खन्ना हे संगरूरमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. परंतु मागील काही काळापासून त्यांनी राजकारणापासून अंतर राखले होते. खन्ना हे संगरूरमध्ये राजकारणापेक्षा स्वतःची स्वयंसेवी संस्था उम्मीदमुळे अधिक लोकप्रिय आहेत.
भाजपमध्ये सामील झालेले कंवरवीर टोहडा यांचे आजोबा गुरचरन सिंह टोहडा हे पंजाबचे राजकीय मातब्बर राहिले आहेत. ते 27 वर्षांपर्यंत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते खासदार देखील राहिले होते. तर धर्मवीर सरीन या अमृतरच्या राजकारणात सक्रीय आहेत. लुधियानातील गुरदीप सिंह गोशा हे यापूर्वी अकाली दलाच्या युवा शाखेचे प्रमुख राहिले आहेत. त्यांना अकाली नेते विक्रम मजीठिया यांचे निकटवर्तीय मानले जाते.
अनेक माजी आमदारांचा होणार प्रवेश भाजपमध्ये सामील होऊ पाहणाऱया नेत्यांची यादी खूपच मोठी आहे. अनेक माजी आमदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. चंदीगडमध्ये भाजपचा महापौर निवडून आल्याने त्याचा प्रभाव पंजाबच्या निवडणुकीतही दिसून येणार असल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे.