अरविंद केजरीवालांकडून 6 आश्वासने : राज्यात लवकरच निवडणूक
वृत्तसंस्था /लुधियाना
पंजाबमधील राजकीय संकटादरम्यान आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राज्याच्या दौऱयावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी गुरुवारी राज्याच्या जनतेला आरोग्य सेवेवरून 6 आश्वासने दिली आहेत. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यास सर्व लोकांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यात गोंधळ घातला आहे. राज्यात सत्तेसाठी गलिच्छ संघर्ष सुरू असून प्रत्येक जण मुख्यमंत्री होऊ पाहतोय तर दुसरीकडे आम आदमी पक्ष पंजाबच्या विकासासाठी दिवसरात्र प्लॅनिंग करत आहे. निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार असल्याचे प्रत्येक जण म्हणू लागला आहे. आमच्या सरकारने दिल्लीत 24 तास वीजपुरवठा उपलब्ध केला आहे. दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्येही आम्ही हे करून दाखवू. व्यापाऱयांसोबत मिळून आम्ही पंजाबसाठी आराखडा तयार केला असल्याचे उद्गार केजरीवालांनी काढले आहेत.
आमचा पक्ष आरोग्य सेवांची हमी देतोय. पंजाबची सद्यस्थिती अत्यंत वाईट आहे. कुणी आजारी पडल्यावर सरकारी रुग्णालयात पोहोचल्यास त्याच्यावर उपचार होत नाहीत. संबंधिताला खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. सरकारी रुग्णालयात डॉक्टर, नर्स, औषधे आणि यंत्रांचा पत्ताच नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी दिल्लीतही अशीच स्थिती होती. आम्ही 5 ते 7 वर्षांमध्ये दिल्लीतील सरकारी रुग्णालयांची दशा बदलली आहे. पंजाबमध्ये देखील आम्ही हे करून दाखवू. पंजाबच्या प्रत्येक व्यक्तीला मोफत आणि चांगला उपचार उपलब्ध करविण्यात येईल. औषधे, चाचण्या, उपचार, ऑपरेशन सर्वकाही मोफत उपलब्ध करण्यात येईल. सर्वांना हेल्थकार्ड प्रदान करण्यात येणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.