लुधियानात केजरीवालांचे उद्गार ः अंतर्गत सुरक्षेची सतावतेय भीती
पंजाब निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठे विधान केले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यावर पंजाबमध्ये हिंदू आणि व्यापारीवर्ग सुरक्षेवरून चिंतेत असल्याचे त्यांनी लुधियाना येथे बोलताना म्हटले आहे. पंजाबने यापूर्वी दहशतवादाचा अत्यंत वाईट काळ अनुभवला आहे. याचमुळे लोकांच्या मनात अंतर्गत सुरक्षेवरून चिंता असल्याचे ते म्हणाले.
भाजप आणि काँग्रेस यांच्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून गलिच्छ राजकारण झाल्याने विशेषकरून हिंदूंच्या मनात अंतर्गत सुरक्षेवरून भीती आहे. पंजाबमध्ये टिफिन बॉम्ब मिळत असून सीमेपलिकडून ड्रोन येत आहेत. लुधियानात स्फोट आणि श्री दरबार साहिबमध्ये अवमानाची घटना घडली. अशा स्थितीत सर्वांना स्वतःच्या सुरक्षेची चिंता असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
आम्ही करत नाही राजकारण
आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास पंजाबच्या सर्व 3 कोटी लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असणार आहे. दिल्लीत केंद्र सरकारसोबत आमचे अनेक मतभेद आहेत, परंतु देश आणि समाजाच्या मुद्दय़ावर आम्ही कधीच राजकारण केलेले नाही. पंजाबमध्येही सुरक्षेवरून आम्ही केंद्रासोबत मिळून काम करू असे ते म्हणाले.
शहरांमध्ये समर्थन कमी
पंजाबमध्ये यंदा आम आदमी पक्षाला ग्रामीण भागांमध्ये प्रचंड समर्थन मिळत आहे. लोक यंदा बदल घडवून आणण्याकरता आपला मत देणार असल्याचे म्हणत आहेत. परंतु शहरांमध्ये आपला फारसे समर्थन मिळत नसल्याचे चित्र आहे. हेच पाहता केजरीवालांनी हिंदूंचा मुद्दा उपस्थित केल्याचे मानले जात आहे. पंजाबमध्ये सुमारे 38 टक्के हिंदू मतदार असून त्यांच्यावर सर्वच पक्षांची नजर आहे.
सीमावर्ती राज्यात प्रामाणिक सरकार हवे
पंजाब हे सीमावर्ती राज्य असून येथे प्रामाणिक सरकार असायला हवे. जर एक अप्रामाणिक मुख्यमंत्री झाल्यास तो अधिकाऱयांना तुम्ही किती पैसे जमा करून आला असे विचारेल. राज्यात पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्थानक प्रमुखाचे पद विकले जाते. पैसे आणणारा अधिकारी अमली पदार्थ विकणार आणि दहशतवाद फैलावणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
एसवायएलचा मुद्दा
सतलज-यमुना लिंक (एसवायएल) कालव्याचा मुद्दा भाजप आणि काँग्रेसने उकरून काढला आहे. या मुद्दय़ावर मी भूमिका घेतल्याने तोडगा निघत असल्यास मी याकरता तयार आहे. विरोधी पक्ष कधी सर्वोच्च न्यायालयात एखादे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा खोटा प्रचार करतात. तर कधी या मुद्दय़ावर लोकांची दिशाभूल करत असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
लुधियानात आप नेत्याचा रोड शो
ढोल-गाण्यांसह शहरात संचार ः हात जोडून मागितली मते लुधियानामध्ये आम आदमी पक्षाने रोड शो आयोजित केला आहे. यात सामील होत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप उमेदवारासाठी मते मागितली आहेत. रोड शोमध्ये ढोलपथक सर्वात पुढे त्यामागे कार्यकर्त्यांची गर्दी, मधोमध केजरीवाल हे उमेदवारासह अभिवादन करत पुढे जात होते.