राज्यात विधानसभा निवडणूक लांबणीवर : निकाल 10 मार्चलाच जाहीर होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने 14 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार आहे. संत रविदास यांची जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सोमवारी निवडणूक आयोगाने तातडीची बैठक घेत निवडणूक 14 ऐवजी 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतला. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकलण्यासाठी पंजाबमधील राजकीय पक्षांनी आयोगावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंजाबमध्ये 14 फेबुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र, 16 फेबुवारी रोजी गुरु रविदास जयंती असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य भक्तगण वाराणसीला जाण्याची शक्यता असल्यामुळे 14 ला होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी होत होती.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भाजप, पंजाब लोक काँग्रेस पार्टी, आम आदमी पक्ष आणि संयुक्त शिरोमणी अकाली दलानेही मतदानाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाला साकडे घातले होते. सर्व पक्षांनी आयोगाला वेगवेगळी पत्रे पाठवली होती. 14 रोजी मतदान झाल्यास अनेक मतदार आपल्या अधिकार-हक्कापासून वंचित राहतील, असा दावा करण्यात आला होता. राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने याबाबत विचार करण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांची बाजू विचारात घेत आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.