शारजाह / वृत्तसंस्था
आयपीएल साखळी सामन्यात आज (रविवार दि. 3) रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध लढतीसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर प्ले-ऑफमधील स्थान निश्चितीच्या दिशेने आगेकूच करण्याचे लक्ष्य असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.
आपल्या पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या आरसीबीचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱया स्थानी विराजमान असून त्यांच्या खात्यावर 14 गुण आहेत. 7 विजय व 4 पराभव ही त्यांची आतापर्यंतची कामगिरी आहे. येथे विजय मिळवल्यास त्यांना आणखी 2 गुण संपादन करत प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित करता येईल. मात्र यासाठी पंजाबचे कडवे आव्हान मोडीत काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. पंजाबने मागील लढतीत केकेआरविरुद्ध मनोबल उंचावणारा विजय संपादन केला होता.
त्यांनी केकेआरला नमवत आपली प्ले-ऑफमधील पोहोचण्याची दावेदारी देखील कायम राखली. सध्या त्यांच्या खात्यावर 5 विजय, 7 पराभवासह 10 गुण आहेत. आरसीबीने यापूर्वी राजस्थानने विजय संपादन केला, त्यावेळी विराट कोहलीला मोठी धावसंख्या रचता आली नसली तरी तो बहरात असल्याचे स्पष्ट झाले. सहकारी सलामीवीर देवदत्त पडिक्कलने देखील विराटला परस्परपूरक भूमिका पार पाडली आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल देखील सलग दोन अर्धशतकांसह बहरात आहे.
दुसरीकडे, पंजाबची भिस्त पुन्हा एकदा कर्णधार केएल राहुल व मयांक अगरवाल यांच्यावर असेल. राहुल व मयांकने फ्लाईंग स्टार्ट दिला तर ती पंजाबसाठी जमेची बाजू ठरेल. शमी व अर्शदीप यांनी मागील लढतीत केकेआरविरुद्ध विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये लक्षवेधी मारा साकारला होता.