वृत्तसंस्था/ अबु धाबी
संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाचे प्ले ऑफ गटातील स्थान अधांतरी असल्याने रविवारीच्या सामन्यात पंजाब संघाची स्थिती ‘जिंकू किंवा मरू’ अशी राहील. चेन्नाई संघाचा हा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहील.
राहुलच्या पंजाब संघाने या स्पर्धेच्या सुरूवातीला पिछाडीवरून चांगलीच मुसंडी मारताना अनेक अव्वल संघांना पराभवाचे धक्के दिले. पंजाब संघाला या स्पर्धेतील आपल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून 7 गडय़ांनी पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या प्ले ऑफ गटातील प्रयत्नाला मोठा धक्का बसला आहे. या पराभवामुळे पंजाब संघाची स्थिती अधांतरी झाली आहे. रविवारच्या सामन्यात पंजाब संघाने चेन्नईचा पराभव केला तरी त्यांना प्ले ऑफसाठी स्थान मिळेल याची खात्री नाही. कारण या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांच्या निकालावर पंजाबचे भवितव्य अवलंबून राहील. सनरायजर्स हैद्राबादने 12 सामन्यांतून 10 गुण मिळविले आहेत. त्यांना आपले उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यातील पराभूत झालेल्या संघापेक्षा अधिक गुण मिळावे लागतील. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे दोन्ही संघ समान 14 गुणांवर आहेत. सनरायजर्स हैद्राबाद संघाला आपल्या उर्वरित दोनपैकी एका सामन्यात हार पत्करावी लागली तसेच पंजाबचा संघ सध्या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 गुणांसह आणि नेट रनरेट-0.133सह चौथ्या स्थानावर आहे. रविवारच्या सामन्यात चेन्नईला पराभूत केले तर पंजाब संघाला प्ले ऑफ गटातील पात्रतेसाठी चांगली संधी उपलब्ध होवू शकेल.
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेन्नई शेवटच्या स्थानावर आहे. मात्र रविवारचा सामना चेन्नईच्या दृष्टीने औपचारिता म्हणून राहील. गुरूवारच्या सामन्यात जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर षटकार खेचून चेन्नईला कोलकाता संघाविरूद्ध विजय मिळवून दिला आहे. या स्पर्धेत पंजाबचा कर्णधार के. राहुल याने फलंदाजीत सध्या सर्वाधिक धावा नोंदविल्या आहेत. रविवारच्या सामन्यात राहुल, खिस गेल, पुरन यांच्या फलंदाजीवर पंजाबचे यश अवलंबून राहील.