भगवंत मान मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध ; पंतप्रधान मोदींकडूनही शुभेच्छा
खटकर कलान / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यामुळे आम आदमी पक्षाचे भगवंत मान आता पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल बी. एल. पुरोहित यांनी त्यांना पंजाबी भाषेत पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि पंजाबच्या भविष्यासाठी एकत्र काम करण्याची हमी दिली. शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे भव्य-दिव्य स्वरुपात मान यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान हे कार्यकाळाच्या दृष्टीने पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पंजाबी भाषेत देवाच्या नावाने शपथ घेतली. यानंतर भाषण करून ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. भगवंत मान 12.30 वाजता शपथ घेणार होते, मात्र ते 50 मिनिटे उशिराने मंचावर पोहोचले. खराब हवामानामुळे त्यांना खटकर कलानला पोहोचण्यास विलंब झाला. यावेळी मंचावर अरविंद केजरीवाल आणि मनिष शिसोदियाही बसंती पगडी घालून उपस्थित होते. दिल्ली सरकारमधील काही मंत्रीही मंचावर दिसून आले. भगवंत मान यांच्या आवाहनाला दाद देत त्यांचे हजारो समर्थक बसंती रंगाची पगडी आणि दुपट्टा परिधान करून समारंभात दाखल झाले होते.
शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून मिळणाऱया पाठिंब्याबाबत समाधानाची भावना व्यक्त केली. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेती, व्यवसाय, शाळा, रुग्णालये सर्व काही ठीक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट पेले. जनतेने आम आदमी पक्षावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे वचनही त्यांनी भगतसिंगांच्या भूमीत दिले. तसेच नवनिर्वाचित आमदारांना उद्देशून बोलताना त्यांनी आपण जनतेमधीलच एक नागरिक असल्याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, असे ते म्हणाले. वेळ आणि जनता ही मोठी गोष्ट आहे. माणसाला जमिनीवर आणायला वेळ विलंब करत नसते. 20 फेब्रुवारी 2022 रोजी कोणत्याही लोभाशिवाय लोकांनी मतदान करण्यास सुरुवात केली, हे येत्या काळात अभ्यासक्रमात शिकवले जाईल, असे ते म्हणाले.
कन्या-पुत्राची उपस्थिती ठरली लक्षवेधी
भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी त्यांची मुलगी सीरत कौर मान आणि मुलगा दिलशान मान अमेरिकेहून खटकर कलान येथे पोहोचले होते. त्यांची उपस्थिती या सोहळय़ातील मोठे आकर्षण ठरले. मान यांनी 2015 मध्ये पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला होता. मात्र, त्यांची दोन्ही मुले सध्या अमेरिकेत असून मान यांच्या शपथविधीच्या निमित्ताने पुत्र-कन्या येथे दाखल झाले होते.
13 एकरात भव्य मंडप
खटकर कलान येथे शपथविधीसाठी सुमारे 13 एकरात मंडप उभारण्यात आला होता. या मंडपात 3 टप्प्यात व्यासपीठ बनवण्यात आली होती. नवे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बी. एल. पुरोहित पहिल्या टप्प्यावर होते. दुसऱया क्रमांकावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळ बसले. तिसऱया बाजूला पंजाबच्या सर्व 116 आमदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेसाठी सुमारे 10,000 जवान तैनात करण्यात आले होते. 100 एकर जागेत शपथविधी सोहळा पार पडला. ज्यामध्ये 40 एकरांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
मान यांच्यासाठी 16 आकडा शुभ
भगवंत मान यांच्यासाठी आतापर्यंत 16 हा आकडा शुभ समजला जात आहे.. 16 मे 1992 रोजी त्यांची पहिली कॅसेट रिलीज झाली. 16 डिसेंबर 1992 रोजी ‘कुल्फी गरमा-गरम’ ही मान यांची दुसरी कॉमेडी कॅसेट प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर राजकीय पातळीवर 16 मे 2014 रोजी, मान प्रथमच संगरूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. मान यांचा पहिला निवडणूक विजय 16व्या लोकसभा निवडणुकीत होता. आता त्यांनी 16 तारखेलाच शपथ घेत पंजाबची नेतृत्त्वधुरा स्वतःच्या हाती घेतली आहे.