सुवर्ण मंदिरातील हत्येनंतरचा दुसरा प्रकार
चंदिगढ / वृत्तसंस्था
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात एका युवकाची धर्मचिन्हांचा अवमान करण्यासाठी हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर चोवीस तासांच्या आत पंजाबमध्येच कपूरथळा येथे याच कारणासाठी आणखी एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. सलग दोन दिवसातील या दुसऱया प्रकारामुळे खळबळ माजली आहे.
या दुसऱया प्रकरणाचा व्हिडीओ प्रसारित होत असून त्यात संतप्त जमाव एका युवकाला मारहाण करताना दिसत आहे. कपूरथळा जिल्हय़ाच्या निजामपूर गावात हा प्रकार घडला. येथील गुरुद्वाराच्या ध्वजाची विटंबना करीत असताना या युवकाला स्थानिक नागरिकांनी रविवारी पहाटे चारच्या आसपास पकडले. पकडणाऱया लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांना हे वृत्त समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला आणि शीख धर्मगुरुंसमोर आम्हीच त्याची चौकशी करु आणि त्याला शीख धर्माच्या नियमांच्या अनुसार शिक्षा करु असे पोलिसांना लोकांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी तरीही त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांशी जमावाची झटापट झाली. अखेर त्या युवकाला मारहाण करुन लोकांनी त्याची हत्या केली, अशी माहिती नंतर पोलिसांकडून देण्यात आली.
शनिवारच्या घटनेची चौकशी
शनिवारी शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात एका युवकाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. तो युवक उत्तर प्रदेशचा असल्याचे प्रारंभिक चौकशीत आढळले आहे. शनिवारी हा युवक तलवार हाती घेऊन सुवर्ण मंदिराच्या गाभाऱयात शिरला होता. त्यावेळी शीख धर्मगुरु पवित्र ‘गुरु ग्रंथसाहिब’चे पठण करीत होते. त्यांच्या जवळ हा युवक पोहोचताच त्याला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्याला बाहेर आणल्यानंतर जमावाकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकाराची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी चौकशीचा आदेश दिला.
या युवकाचे वय 25 ते 30 असावे असे स्पष्ट करण्यात आले. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. सुवर्ण मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत असून तो नेमका कोणत्या वेळी सुवर्ण मंदिरात आला हे पडताळण्यात येत आहे. त्याच्यासमवेत किती लोक होते याचीही माहिती काढण्यात येत आहे.
प्रबंधक समितीवर नाराजी
सुवर्ण मंदिरातील या घटनेनंतर अनेक शीख संघटना आणि मान्यवरांनी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या ढिलाईवर कठोर टीका केली. सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व याच समितीकडे आहे. अशा स्थितीत हा युवक मंदिराच्या गाभाऱयापर्यंत पोहचला कसा, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. सुवर्ण मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया
पंजाब लोक काँगेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शीख धर्मियांच्या पवित्र धर्मचिन्हांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि त्यांवर उमटलेली समाजाची तीव्र प्रतिक्रिया हे दुःखद प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पंजाबच्या काँगेस आणि भाजपच्या नेत्यांनीही निषेध व्यक्त केला.