ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाब सरकारकडून कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम अजून पुढे नेत, सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पंजाब राज्यातील खाजगी रुग्णालयांना देखील आता किंमतीनुसार, सरकारी प्लाझ्मा बँककडून प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेतला आहे.
चिकित्सा शिक्षा आणि संशोधन विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पंजाब सरकार प्लाझ्मा बँक स्थापन करण्यापूर्वीपासूनच कोरोना ची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत आहे. खाजगी रुग्णालयांकडून ही प्लाझ्मा देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. या मागणी नंतर सरकारकडून खाजगी रुग्णालयांना किंमतीनुसार म्हणजेच प्रति युनिट 20 हजार रुपये प्रमाणे प्लाझ्मा उपलब्ध करून दिला जावा असा निर्णय घेतला गेला आहे.
तसेच पंजाब मधील सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा निःशुल्क उपलब्ध करून दिला जाईल असेही प्रवक्त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विभागाकडून यासंदर्भात सूचना पत्र देखील जारी करण्यात आले आहे. पंजाब मधील पहिल्या प्लाझ्मा बँकेचे उदघाटन मेडिकल शिक्षण आणि संशोधन मंत्री ओम प्रकाश सोनी यांच्या हस्ते 21 जुलै रोजी ऑनलाईन प्रणाली द्वारे करण्यात आले.