वृत्तसंस्था/ अलुर
सईद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धेत सोमवारी इलाईट अ गटातील झालेल्या सामन्यात पंजाबने त्रिपुराचा 5 गडय़ांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या गटातील दुसऱया एका सामन्यात विद्यमान विजेत्या कर्नाटकाने उत्तरप्रदेशवर 5 गडय़ांनी विजय मिळवित बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.
सोमवारी अ गटातील झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तरप्रदेशने 20 षटकांत 8 बाद 132 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाने 19.3 षटकांत 5 बाद 136 धावा जमवित विजयासह 4 गुण घेतले. उत्तरप्रदेशच्या डावात अभिषेक गोस्वामीने 47, कर्ण शर्माने 41, सुरेश रैनाने 4, गर्गने 6 धावा केल्या. कर्नाटकातर्फे सुचित आणि प्रवीण दुबे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर कर्नाटकाच्या डावात श्रेयस गोपालने 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 47, देवदत्त पडीक्कलने 34 धावा जमविल्या. उत्तरप्रदेशतर्फे शर्माने 23 धावांत 2 बळी मिळविले.
अ गटातील अन्य एका सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 3 बाद 183 धावा जमविल्या. पंजाब संघातील मनदीप सिंगने 66 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 99 धावांची खेळी केली. गुरूकिरत सिंग मानने 33 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह 63 धावा झोडपल्या. गुरूकिरत सिंग आणि मनदीप सिंग यांनी 110 धावांची भागिदारी केली. त्यानंतर त्रिपुराने 4 बाद 161 धावा जमविल्या. मिलींदकुमारने 40 चेंडूत नाबाद 64, बोसने 50, रजत डे याने नाबाद 38 धावा केल्या. या स्पर्धेत अ गटातून पंजाबने सलग पाच सामने जिंकून 20 गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. पाच इलाईट गटातील आघाडीचे संघ आणि प्लेट गटातील आघाडीचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी थेट पात्र ठरतील. बाद फेरीसाठी गुण, विजय तसेच सरस धावसरासरी यांचा निकष धरला जाईल.
अ गटातील अन्य एका सामन्यात जम्मू-काश्मीरने रेल्वेचा 7 गडय़ांनी पराभव करत 4 गुण वसूल केले. या सामन्यात रेल्वेने 20 षटकांत 9 बाद 133 धावा जमविल्या. मृणाल देवधरने 57, प्रथम सिंगने 42 धावा केल्या. जम्मू-काश्मीरतर्फे उमरान मलिकने 3 तर परवेज रसूलने 2 गडी बाद केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरने 15.5 षटकांत 3 बाद 135 धावा जमवित विजय मिळविला. सुर्यांश रैनाने 48 तर अब्दुल समदने 39 धावा जमाविल्या.
संक्षिप्त धावफलक
उत्तरप्रदेश 20 षटकांत 8 बाद 132, कर्नाटक 19.3 षटकांत 5 बाद 136
पंजाब 20 षटकांत 3 बाद 183, त्रिपुरा 20 षटकांत 4 बाद 161
रेल्वे 20 षटकांत 9 बाद 133, जम्मू-काश्मीर 15.5 षटकांत 3 बाद 135.