अनेक आमदार अमरिंदरसिंग यांच्या पाठीशी
चंदीगड / वृत्तसंस्था
विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाही पंजाबमध्ये काँगेस पक्षातील संकट कमी होण्याऐवजी वाढू लागले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना आमदारांचा वाढता पाठिंबा असून त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू एकाकी पडत असल्याचे दिसत आहे. रविवारी 11 आमदारांनी अमरिंदरसिंग यांना पाठिंबा दिला असून त्यांच्याशिवाय तरणोपाय नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कॅप्टन अमरिंदरसिंग हे पंजाबमधील सर्वोच्च लोकनेते आहेत. त्यांची तुलना अन्य कोणाशी केली जाऊ नये असे या आमदारांनी स्पष्ट केले. सिद्धू यांची स्पर्धा वाढू लागल्यानंतर आता अमरिंदरसिंग यांनी आपल्या समर्थक आमदारांचा गट मजबूत करण्यात प्रारंभ केला असून रविवारी त्यांनी 25 आमदारांची भेट घेतली. या साऱयांना त्यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला असे सांगण्यात येते. यांच्यापैकी 11 आमदारांनी त्यांना उघड पाठिंबा दिला असून इतर आमदार योग्यवेळी समोर येतील अशी शक्यता आहे. तिकडे सिद्धू यांनीही समर्थनासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आशिर्वाद मिळविण्याची धडपड चालविली आहे.
पक्षश्रेष्ठींची स्थिती द्विधा
अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील तर सिद्धू यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असा तोडगा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी काढला होता. तथापि, पक्षाध्यक्षपद सिद्धू यांच्याकडे गेल्यास त्यांचे वजन वाढेल आणि ते उमेदवार निवडीत हस्तक्षेप सुरू करतील अशी चिंता अमरिंदरसिंग यांच्या गटाला वाटते. त्यामुळे सिद्धू यांचा पक्षातील प्रभाव वाजवीपेक्षा अधिक वाढू नये, यासाठी या गटाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँगेस श्रेष्ठींनाही समतोल साधणे अवघड होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिद्धू गटही सक्रिय
सिद्धू यांनी रविवारी आपल्या हालचालींचा वेग वाढविला. त्यांनी मदनलाल जलालपूर आणि मंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांची भेट घेतली. आमदार बरिंदरमीतसिंग पाहरा आणि निर्मलसिंग यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र, या नेत्यांनी उघडपणे सिद्धू यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यास नकार दिल्याचे समजते. पक्षाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे सिद्धू काहीसे पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणता तोडगा, केव्हा काढतात यावर सर्वकाही अवलंबून असल्याची चर्चा आहे.