काँग्रेस प्रवक्ते प्रिन्स खुल्लर यांचा पंजाब लोक काँग्रेसमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ पतियाळा
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजकीय गोतावळा वाढू लागला आहे. काँग्रेसचे माजी सचिव आणि प्रवक्ते प्रिन्स खुल्लर यांनी पंजाब लोक काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या 3 मोठय़ा नेत्यांनी कॅप्टन यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आल्यावर कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेतृत्व आणि विशेषकरून प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस नेतेच प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
प्रिन्स खुल्लर हे काँग्रेसचे प्रभावी प्रवक्ते राहिले आहेत. यापूर्वी प्रितवाल सिंह बलियावाल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीत अमरिंदर यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री हमीर सिंह यांचे पुत्र लाडी घग्गा, काँग्रेस नेते संदीप सिंगला आणि विकास शर्मा यांनीही अमरिंदर यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होताच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आमच्या पक्षात दाखल होतील, यात मोठय़ा नेत्यांसह काँग्रेसचे आमदारही सामील असतील असा दावा कॅप्टन यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते आताच आमच्या पक्षात दाखल झाल्यास काँग्रेसचे सरकार त्यांना त्रास देऊ शकते. याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी दिला जाणार नसल्याचे कॅप्टन यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत कॅप्टन यांच्या या दाव्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.