पंजाबचा केकेआरला धक्का, दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमध्ये धडक
दुबई / वृत्तसंस्था
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने शुक्रवारी आयपीएल साखळी सामन्यात केकेआरला 5 गडी राखून मात दिली आणि या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. या लढतीत केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या तर प्रत्युत्तरात पंजाबने 19.3 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात 168 धावांसह विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल (55 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 67) व मयांक अगरवाल (27 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 40) यांनी 8.5 षटकात 70 धावांची सलामी दिली आणि इथे पंजाबच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली. मधल्या फळीत निकोलस पूरन (12), मॅरक्रम (18), दीपक हुडा (3) स्वस्तात बाद झाल्याने पंजाबचा संघ काहीसा अडचणीत जरुर होता. पण, शाहरुख खानने अवघ्या 9 चेंडूत नाबाद 22 धावांची आतषबाजी करत संघाचा विजय खेचून आणला. त्याच्या खेळीत 1 चौकार, 2 षटकारांचा समावेश राहिला.
केकेआरच्या अय्यरची फटकेबाजी
प्रारंभी, वेंकटेश अय्यरने 67 धावांची तडफदार खेळी साकारल्यानंतर नितीश राणाने देखील 18 चेंडूत 31 धावांची आतषबाजी केली. तरी पंजाबने केकेआरला 7 बाद 165 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले होते.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर बहरातील केकेआरच्या फलंदाजांनी डावातील बहुतांशी टप्प्यात वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमी (1-23) व अर्शदीप सिंग (3-32) यांनी डेथ ओव्हर स्पेल्समध्ये भेदक मारा केला नसता तर केकेआरला आणखी बडी धावसंख्या रचणे शक्य झाले असते.
अय्यर व त्रिपाठी (26 चेंडूत 34) यांनी 72 धावांची भागीदारी साकारली. राणाची फटकेबाजी देखील केकेआरसाठी महत्त्वाची ठरली. डावखुरा अर्शदीप सिंग पंजाबतर्फे पुन्हा एकदा टॉप परफॉर्मर ठरला. त्याने प्रारंभी शुभमन गिलला (7) बाद करत पहिला धक्का दिला.
वेंकटेश अय्यरने या हंगामातील आपला बहारदार फॉर्म कायम राखत पंजाबच्या हरएक गोलंदाजावर तुटून पडण्याचा सिलसिला सुरु केला. चेंडू थांबून बॅटवर येत असताना या प्रतिकूल स्थितीतही त्याची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. फलंदाजांचा सकारात्मक पवित्रा आणि पंजाबच्या गोलंदाजांचा स्वैर मारा यामुळे धावफलक सातत्याने हलता राहिला.
अखेर ही जोडी फिरकीपटू रवी बिश्नोईने फोडली. त्याने त्रिपाठीला डीपमधील हुडाकरवी झेलबाद केले. बिश्नोईने 4 षटकात 22 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले. वेंकटेशने ऍलनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत अर्धशतक साजरे केले आणि नंतर त्याला षटकारासाठी पिटाळून लावत संघाचे शतक थाटात फलकावर लावले.
बिश्नोईने वेंकटेश अय्यरला तर शमीने प्रतिस्पर्धी कर्णधार मॉर्गनला बाद करत केकेआरला दुहेरी झटके दिले. यात अय्यर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हुडाकडे झेल देत परतला तर मॉर्गनला पायचीत होत परतावे लागले.
धावफलक
केकेआर ः वेंकटेश अय्यर झे. हुडा, गो. बिश्नोई 67 (49 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल त्रि. गो. अर्शदीप 7 (7 चेंडूत 1 चौकार), राहुल त्रिपाठी झे. हुडा, गो. बिश्नोई 34 (26 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), नितीश राणा झे. अगरवाल, गो. अर्शदीप 31 (18 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), इयॉन मॉर्गन पायचीत गो. शमी 2 (2 चेंडू), दिनेश कार्तिक त्रि. गो. अर्शदीप 11 (11 चेंडू), टीम सेफर्ट धावचीत (शमी) 2 (4 चेंडू), सुनील नरेन नाबाद 3 (3 चेंडू). अवांतर 8. (बाईज 3, लेगबाईज 1, वाईड 4). एकूण 20 षटकात 7 बाद 165.
गडी बाद होण्याचा क्रम
1-18 (शुभमन, 2.2), 2-90 (राहुल त्रिपाठी, 11.3), 3-120 (अय्यर, 14.4), 4-124 (मॉर्गन, 15.5), 5-149 (राणा, 17.4), 6-156 (सेफर्ट, 18.4), 7-165 (दिनेश कार्तिक, 19.6).
गोलंदाजी
फॅबियन ऍलन 4-0-38-0, मोहम्मद शमी 4-0-23-1, अर्शदीप सिंग 4-0-32-3, नॅथन इलिस 4-0-46-0, रवी बिश्नोई 4-0-22-2.
पंजाब किंग्स ः केएल राहुल झे. मावी, गो. अय्यर 67 (55 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मयांक अगरवाल झे. मॉर्गन, गो. वरुण 40 (27 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), निकोलस पूरन झे. मावी, गो. वरुण 12 (7 चेंडूत 1 षटकार), एडन मॅरक्रम झे. गिल, गो. नरेन 18 (16 चेंडूत 1 षटकार), दीपक हुडा झे. त्रिपाठी, गो. मावी 3 (4 चेंडू), शाहरुख खान नाबाद 22 (9 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), फॅबियन ऍलन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 6 (लेगबाईज 2, नोबॉल 1, वाईड 3). एकूण 19.3 षटकात 5 बाद 168.
गडी बाद होण्याचा क्रम
1-70 (मयांक, 8.5), 2-84 (पूरन, 10.4), 3-129 (मॅरक्रम, 15.3), 4-134 (हुडा, 16.3), 5-162 (केएल राहुल, 19.2)
गोलंदाजी
टीम साऊदी 4-0-40-0, शिवम मावी 4-0-31-1, वरुण चक्रवर्ती 4-0-24-2, सुनील नरेन 4-0-34-1, वेंकटेश अय्यर 2.3-0-30-1, नितीश राणा 1-0-7-0.