ऑनलाईन टीम / जालंधर :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे जालंधर प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. जालंधरमध्ये आज पासून रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी घनश्याम थोरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी देखील प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. महानगरात अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि चिंताजनक बाब म्हणजे सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.
शुक्रवारी देखील शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये 61 विद्यार्थ्यांसह 177 नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी गुरुवारी मागील 5 महिन्यातील सर्वात जास्त रुग्ण संख्या आढळून आली. जालंधरमध्ये मागील एक वर्षात पहिल्यांदाच 79 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये 13 शिक्षकांचा देखील समावेश होता.