ऑनलाईन टीम / मोहाली :
पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. पंजाबच्या मोहाली भागामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. मोहालीच्या खरड लांडरा रोडजवळ ही इमारत आहे. ढिगाऱयाखाली अनेक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पंजाब पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.
मोहाली येथील तीन मजली इमारत अचानक कोसळली. इमारतीच्या बेस इमारतीच्या ढिगाऱयाखाली अडकलेल्या दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अजून सहा ते सात जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळावर मदतीसाठी बारा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या बेसमेंटमध्ये खोदकाम सुरु होते. त्याचवेळी अचानक इमारत कोसळली असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.