सहा पोलिसांसह सात अबकारी अधिकारी निलंबित
चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील तीन जिल्हय़ात बनावट दारूमुळे दगावलेल्यांचा आकडा 86 वर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसात येथे बऱयाच मद्यपींना विषारी दारूचा फटका बसला आहे. अजूनही काही जणांवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत अबकारी खात्यातील सात अधिकारी आणि 6 पोलीस अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारूप्रकरणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी पातळीवर चौकशीचे आदेश दिले होते. तथापि विरोधी पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने न्यायालयीन पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पंजाबमधील अमृतसर, बटाला आणि तरण-तारण या तीन जिल्हय़ांमध्ये विषारी दारूमुळे अनेक मद्यपींना फटका बसला होता. तरण-तारण जिल्हय़ात मृतांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वात पहिली घटना 29 जुलैच्या रात्री अमृतसरमधील तरसिक्का तालुक्यात घडली होती. त्यानंतर आणखी दोन दिवसात आणखीही काही मद्यपींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजूनही काही जण इस्पितळात उपचार घेत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत.