चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकून देणाऱया हेवीवेट वेटलिफ्टर विकास ठाकुरला 50 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले. लुधियाना शहरातील विकास ठाकुरने बर्मिंगहममध्ये पुरुषांच्या 96 किलोग्रॅम वजनगटात 346 किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. त्याचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरे रौप्य व एकूण तिसरे पदक ठरले होते. यापूर्वी 2014 ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत विकास ठाकुरने रौप्य तर गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी यापूर्वी मंगळवारी वेटलिफ्टर हरजिंदर कौरला देखील 40 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. हरजिंदरने बर्मिंगहममध्ये कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे.