चंदिगढ ः
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडी सक्रिय झाली आहे. ईडीने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी केली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांचा भाचा भूपिंदर सिंग हनी याच्यावर छापेमार केल्यानंतर तब्बल आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी चन्नी यांच्या भाच्याला अटक केली.
अंमलबजावणी संचलनालयाने नुकतीच पंजाबमध्ये 10 ठिकाणी छापेमारी केली. अवैध रेती व्यवसाय आणि त्यातून होणारी पैशांची देवाण-घेवाण यासंदर्भात ही छापेमारी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा भाचा भूपिंदर सिंग हनी यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. हनी हा मोहाली भागात राहात असून तो राहात असलेल्या होमलँड सोसायटीवर ईडीच्या पथकाने छापेमारी केली. रेतीचा ठेका मिळवण्यासाठी भूपिंदर याने पंजाब रिअल्टर्स नावाची कंपनी स्थापन केली होती. त्याने रेतीचे ठेके मिळवण्यासाठी काळय़ा पैशाचा वापर केल्याचा ईडीला संशय आहे.