ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यातच आता 3803 पोलीस अधिकाऱ्यांसह, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2186 कर्मचारी पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत 38 पोलीस अधिकाऱ्यांसह 1597 पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डिजीपी संजय गुप्ता यांनी सांगितले की, कोरोना काळात आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत. पण काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने आम्ही सर्वांची कोरोना टेस्ट केली. यामध्ये 3803 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सद्यस्थितीत 1597 अधिकारी पॉझिटिव्ह आहेत. ज्यामध्ये 38 राजपत्रित अधिकारी आणि 21 एसएचओ आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील जवळपास 32 सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 50 अन्य पोलीस कर्मचारी जे पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आले होते ते आयसोलेट झाले आहेत.