तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
मोहोळ तालुक्यातील एक महिला रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह निघाली. सदरची महिला पंढरपूरातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसुत झाली होती. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ‘त्या’ खाजगी हॉस्पिटलशी संलग्नित असणा-या 47 लोकांना क्वॉरटाइंन केले आहे. यामध्ये 10 डॉक्टरांचा समावेश आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यांचे काम सुरू आहे.
पंढरपूरातील एका नामांकित हॉस्पिटलमधे मोहोळ तालुक्यातील पेनूर-पाटकुलची महिला पंढरीत प्रसुतीसाठी आली होती. सदरची महिला येथील हॉस्पिटलमधे प्रसुत झाली. त्यावेळी तिला जुळी अपत्ये झाली. यामधील एक अपत्य मृत पावले आहे. तर दुसऱ्या अपत्त्यावर येथील बाल रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यानंतर या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे हया महिलेला सोलापूरला उपचारासाठी पाठवण्यात आले. आणि यानंतर ती महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे.
विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील महिलेचा कोरोना अहवाल रविवारी प्राप्त झाला. यानंतर सदर महिलेवर उपचार झालेल्या पंढरपूरच्या हॉस्पिटलमधे नव्याने रूग्ण भरती करणे. आणि रूग्ण तपासणे. यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच या रूग्णालयातील महिलेवर उपचार करणारे डॉक्टर्स , नर्स व इतरही अनेक व्यक्तीं यांची यादी तयार करून या सर्व व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यामधे प्रामुख्याने महिलेचे नातेवाईक यांचा देखिल समावेश आहे.
क्वॉरंटाईन केलेल्या 47 व्यक्तीमध्ये 10 डॉक्टरांचा समावेश आहे. तर इतरांमधे हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्व 47 क्वॉरटाइंन रूग्णांची स्वॅब तपासणी पाच दिवसानंतर होणार आहे. यानंतर या रूग्णांच्या अहवालानंतर पुढील दिशा ठरली जाणार आहे. यामधे सध्या प्रशासनाकडून 47 क्वॉरंटाईन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वॉरंटाईन करण्यांचे काम सुरू करण्यात आले आहे.
‘त्या’ महिलेचा 21 ते 25 एप्रिल पंढरपुरात मुक्काम
मोहोळ तालुक्यातील पंढरपूरात प्रसुतिसाठी आलेली महिला 21 एप्रिल ते 25 एप्रिल पंढरपूरच्या हॉस्पिटलमधे उपचाराकरिता होती. यापूर्वी सदरची महिला 18 एप्रिल ते 20 एप्रिल सोलापूरच्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत होती. त्यामुळे 21 ते 25 एप्रिलपर्यत संबधित पंढरपूरच्या खाजगी रूग्णालयाशी संपर्क आलेल्या व्यक्तींना होम क्वॉरटाइंन करण्यांचे काम सुरू आहे.
प्रशासनाकडून खबरदारींच्या उपायासाठी सुचना…
- क्वॉरंटाइन व्यक्तींच्या कुंटुबियांना होम क्वॉरटाइंन करणे.
- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणा-या रूग्णाची माहीती प्रशासनाला कळवणे.
- रूग्णालयातील रूग्णांची आणि व्हिजीटर्स-नातेवाईक यांची संपूर्ण माहीती हॉस्पिटल प्रशासनाने ठेवणे.
- डॉक्टरांनी पीपीई किट वापरूनच रूग्णांची तपासणी करणे.
- डॉक्टरांच्या संपर्कात राजकीय व्यक्ती…
पंढरपूरात सध्या काही डॉक्टरांना क्वॉरटाइंन करून ठेवण्यात आले आहे. यामधे संबधित डॉक्टरांच्या खाजगी रूग्णालयात एक मातब्बर राजकीय व्यक्ती उपचारासाठी जाउन आले होते. त्यामुळे या राजकीय व्यक्तीचा देखिल समावेश डॉक्टरांच्या संपर्कातील यादीमधे येऊ शकतो. असे सुत्रांकडून समजते आहे.