वार्ताहर पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 1643 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. 84 उमेदवार बिनविरोध असून अर्ज माघारीनंतर 1573 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत तर तालुक्यातील एकमेव जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज माघार घेण्याच्या ठिकाणी सकाळ पासूनच मोठी गर्दी होती. उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती, पुढील पाच वर्षात मदतीचे आश्वासन देण्याचे काम पुढाऱ्यांकडून सुरू होते. गादेगाव व खेडभाळवणी ग्रामपंचायतीचे अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत उशीर झाला होता. सही नसताना अर्ज कसा माघारी घेण्यात आला. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया संध्याकाळी सहापर्यंत सुरू होती.
तालुक्यातील शिरगाव 5, कासेगाव 1, पोहोरगाव 1, शंकरगाव 1, अजनसोंड 1, फुलचिंचोली 12, मगरवाडी 8, देगाव 8, सांगवी 1, जैनवाडी 9, उपरी 4, भोसे 11, सुगाव भोसे 1, नेपतगाव 1, गोपाळपूर 4, सरकोली 7, रांझणी 2, कोंढारकी 3 वाखरी तीन खेडभाळवणी 1 या ठिकाणचे एकूण 84 उमेदवार बिनविरोध निवडले आहेत.
अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने गावोगावी प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. कॉर्नर बैठका, पदयात्रा, वैयक्तिक गाठीभेटी, रुसवे-फुगवे काढण्याचे काम प्रत्येक गावात दिसणार आहे. स्थानिक पातळीवर सर्व गट-तट मिळून-मिसळून आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकाला दिवशीच तालुक्यातील नेत्यांचे प्राबल्य समजेल.
1600 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.
अर्ज माघारी व निवडणूक चिन्हांचे वाटप सोमवारी करण्यात आले आहे. निवडणुकीच्या संदर्भात 1600 कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सॅनिटायझर, मास्कचा वापर ही खबरदारी घेत दोन तासाचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
विवेक साळूंखे,
प्रभारी तहसीलदार,पंढरपूर.