आचार्य तुषार भोसलेंच्या अंगावर राष्ट्रवादीकडून शाई टाकण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / पंढरपूर
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाावून जात हमरीतुमरीवर आल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांना वेगळे केले. विठ्ठलाच्या दारातच राजकीय राडा झाल्याने राज्यभरातुन आलेल्या भाविकांना नवलच वाटले. यावेळी परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनाला आले. आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. या नंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आचार्य तुषार भोसले यांना विरोध करत त्यांच्या अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी त्यांना रोखले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे व सुरज पेंडाल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वेगळे केले. यावेळी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरात घोषणाबाजी केली.