पंढरपूर/ प्रतिनिधी
माघ वारीमध्ये दशमी आणि एकादशीला विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. अशातच 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा होत आहे. या यात्रेमध्ये दशमी आणि एकादशी असे दोन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन हे मंदिर समितीकडून बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे अप्रत्यक्षरित्या पंढरपूरच्या माघी यात्रेवर देखील आता संकट उभे ठाकले असल्याचे बोलले जात आहे. कोरोनामुळे शासनाने चैत्री आषाढी आणि कार्तिकी अशा तीनही यात्रा रद्द केल्या. माघी बाबत अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही. पण मंदिरे समितीच्या निर्णयानंतर शासनाकडून यात्रा रद्द होईल.अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. विठ्ठलभक्तांना माघी यात्रा होईल. अशी अपेक्षा होती. मात्र मंदिर समितीचा निर्णयाने आता माघी यात्रेवरही गंडांतर आले आहे.