पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण, डॉ. राजेंद्र भोसले पंढरपुरात दाखल
सोलापूर/प्रतिनिधी
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आजारी पडल्यामुळे तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे होमक्वांरटाईन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा नियोजनातील नियोजनाची जबाबदारी पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. भोसले पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होत आहेत. त्यामुळे पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर आषाढी यात्रेची जबाबदारी सोपवली आहे.
पाच महिन्यांपूर्वी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचा कारभार होता. डॉक्टर भोसले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आली. चार महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात गुंतून पडली आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री पंढरपुरात येणार आहेत. या काळातच महापालिका आयुक्त आजारी पडल्याने जिल्हाधिकार्यांना घरात बसून काम करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. या काळात पंढरपूरसाठी एक अनुभवी अधिकाऱ्यांची गरज होती. अखेर आषाढी यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी डॉ. भोसले यांच्याकडे देण्यात आली