वार्ताहर / पंढरपूर
सोलापूर जिल्ह्यामध्ये जनावरांवरती लंपी स्कीन रोग व कोरोना रोगाच्या प्रदुर्भावामुळे पंढरपूर येथील कार्तिक यात्रा कालावधीत भरवला जाणारा जनावरांचा बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
जनावरांमध्ये आढळणारा लंपी रोग हा संसर्गजन्य असल्याने ह्या रोगाचा प्रसार हा बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारे, बाह्यकिटकाद्वारे, लाळ व स्ञाव इत्यादी माध्यमातून होतो. सदर रोगाच्या नियंञणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा ‘नियंञित क्षेत्र’ घोषीत केलेला असून प्राण्यांचे बाजार, जत्रा भरविणेस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर यांनी २९ ऑक्टोंबर रोजीच्या पत्राद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर यांना सांगितले आहे.
तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रदुर्भाव रोखणेसाठी शासनाकडून ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन बंधने लागू आहेत. त्यामुळे २२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर अखेर कार्तिक यात्रा कालावधीत भरणारा जनावरांचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने रद्द करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चालणारा कार्तिकीवारी दरम्यान भरला जाणा-या जनावरांच्या बाजारामध्ये खंड पडणार आहे.