पंढरपूर / प्रतिनिधी
कार्तिकी वारीचा सोहळा अगदी काही दिवसांवर आला असतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर संप सुरू आहे. शासन पातळीवर याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने राज्यभरातील प्रवाशांना याची झळ पोहोचत आहे.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पंढरपूर बस स्थानकातून खाजगी बसेस धावू लागल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच बस स्थानकाच्या फलाटावरती खाजगी वाहने लागली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाने प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. पंढरपूर बस स्थानकातून पुणे, सोलापूर, मिरज, मुंबई आदी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. एसटी नियमाच्यानुसारच प्रवाशांकडून तिकीट दर आकारण्याच्या सूचना आरटीओ विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
खाजगी बस, स्कूल बस, क्रुझर, कार अशा एकूण 31 प्रवासी गाड्या असून आरटीओ विभागाचे अमरसिंह गवारे, मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान पंढरपूर येथील प्रवासी वाहतुकीची पाहणी व तपासणी केली. आरटीओ विभागाच्या ऐश्वर्या धल्लु यांच्याकडे पंढरपूर येथील वाहतुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.